सावरकर एक विचारधारा - कोलूचे यातनाकांड अर्थात भाग ७

मराठी HISTORYVEER SAVARKAR

Apoorv Kulkarni

1 min read

मागील लेखामध्ये आपण पाहिले की, सावरकरांना डोंगरीच्या तुरुंगातून भायखळा आणि तेथून ठाण्याच्या तुरुंगामध्ये नेण्यात आले होते. ठाण्याहून त्यांना विशेष सुरक्षेमध्ये रेल्वेने मद्रासला नेण्यात आले आणि तेथून ‘महाराजा’ या बोटीवरून अंदमान येथे नेण्यात आले. सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना ठेवायचे म्हणून खास एक संपूर्ण चाळ रिकामी करण्यात आली होती.

अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे खरोखरच पृथ्वीवरील एक नरकच होता. या नरकातील प्रमुख म्हणजे जेलर बारी, तो स्वतःला सेल्युलर जेल चा परमेश्वरच म्हणवून घेत असे. हा स्वघोषित परमेश्वर सर्वांना खूप छळत असे. या नरकातील सर्वात भयानक शिक्षा म्हणजे कोलू फिरवणे. कोलू म्हणजे तेल काढण्याचे एक यंत्र/घाणा. सामान्यतः यासाठी बैलांचा वापर केला जायचा. पण, अंदमानमध्ये हे काम माणसासाठी ठेवलेले होते. प्रत्येकाला दिवसाला किमान ३० पौंड तेल काढणे बंधनकारक होते. अखेर बारीने या बॅरिस्टर माणसाला सुद्धा कोलूला जुंपले.

कोलू फिरवताना सावरकरांना थकल्यासारखं होई, सतत गोल-गोल फिरून चक्कर येत असे आणि जेंव्हा संध्याकाळी यातून सुटका होई त्यावेळी शरीर इतके थकून जायचे की, अंग ठणकू लागायचे. सारी रात्र कोठडी मधील लाकडी फळीवर तळमळत-तळमळत काढावी लागायची.

एकदा असेच सावरकर कोलू फिरवत असताना तेथे जेलर बारी आला व त्यांना म्हणाला, ‘बघा तो बाजूचा कैदी दुपारपर्यंतच ३० पौंड तेल काढून देतो आणि तुमचा दिवस संपला तरी दोन पौंड कमीच पडते. या सगळ्याबद्दल तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे.’सावरकरांनी लगेच त्याला आपल्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिले, ‘लाज वाटली असती जर लहानपणापासूनच असे कष्ट करण्याची सवय असती. त्या कैद्याला जर तुम्ही एक तासात कविता करून द्यायला सांगितली तर ते त्याला जमेल काय ? मी ती तुम्हाला अर्ध्या तासात देऊ शकतो.’

त्याआधी सेल्युलर जेल मधील या स्वघोषित परमेश्वराला असे सडेतोड उत्तर द्यायचे धाडस कोणी केले नव्हते. पण आता बारीला तोही अनुभव चांगलाच आला. फक्त त्याचे नशीब चांगले की, त्या वेळी हे संभाषण ऐकायला तेथे इतर कोणी व्यक्ती नव्हती. सावरकरांच्या सर्व साहसी कथा व त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे तुरुंगामधील लोक देखील त्यांना प्रचंड मानत असत. इतर राजबंदी सावरकरांना त्रास पडू नये म्हणून त्यांच्या नकळतच त्यांचे कपडे व त्यांची भांडी धुऊन देत असतात. याबद्दल कधी-कधी त्यांना जमादाराकडून मार देखील खावा लागे पण राजबंदी तरीही सावरकरांची सेवा करण्यात कचरत नसत. पण सावरकर स्वतः कधीही कोणालाही आपले काम सांगत नसत. उलट आपल्यासाठी हे लोक इतके कष्ट सोसतात, म्हणून सावरकर अगदी संकोचून जायचे.

अंदमानच्या तुरुंगाच्या नियमानुसार एक वर्षानंतर कैद्याला तुरुंगाबाहेर राहायला जाण्याची मुभा मिळत असे. त्यासाठी सावरकरांनी अंदमानच्या चीफ कमिशनर कडे अर्ज केला. तर त्याला उत्तर आले, ‘तुमची तुरुंगातील वागणूक जरी चांगली असली. तरी तुमचा मागचा इतिहास पाहता तुम्हाला ही सवलत देता येणार नाही’. म्हणजे थोडक्यात इंग्रज सरकार काही केल्या ‘मार्सेलिस’ विसरू शकत नव्हते. ‘मार्सेलिस’ च्या प्रसंगामुळे इंग्रजांनी सावरकरांची चांगलीच धास्तीच घेतली होती. येथे होणाऱ्या अतोनात छळामुळे आणि त्रासामुळे सावरकरांच्या मनात अगदी आत्महत्येचाही विचार येउन गेला. पण नंतर त्यांनीच स्वतःला समजावले की, आत्महत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही. मी आत्महत्या करून काही देशाची सेवा करू शकत नाही. तेव्हा जिवंत राहूनच आपल्या हातून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ याप्रमाणे होईल तितके कार्य करत राहू.

मुळात अशा नरक यातना भोगताना कोणालाही असे विचार येणे अगदी स्वाभाविकच होते. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत बसतील किंवा कोणासमोर नमतील ते सावरकरच नव्हेत.

अग्नी जाळी मजसी ना, खङग छेदितो

भिउनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो

(वि.दा.सावरकर यांच्याच कवितेतील काही ओळी)

याप्रमाणे ते येथेही परिस्थितीला घाबरून किंवा नशिबाला दोष देत स्वस्थ बसले नव्हते. सेल्युलर जेलमध्ये सर्व कैद्यांना माणुसकीच्या दृष्टीने अतिशय हीन अशी वागणूक दिली जात असे. शेवटी कैदी असले तरी तीही माणसेच होती आणि त्यातील बहुतांशी कैदी हे राजकीय गुन्ह्यांसाठी म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध कारवाया केल्या म्हणून शिक्षा झालेले होते, कोणी खुनी-दरोडेखोर नव्हे. त्यासाठीच सावरकरांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अंदमानच्या चीफ कमिशनरकडे काही मागण्या देखील केल्या होत्या. पण त्यांनी त्या फेटाळून लावल्या. म्हणूनच सावरकरांनी सेल्युलर जेलमध्येच बंड पुकारले. सर्व राजबंदी व कैदी संप करू लागले. बारीने हा संप मोडून काढण्यासाठी नाना प्रकार करून पहिले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट या बातम्या भारतामधल्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होउ लागल्या. मुळात या बातम्या अंदमानच्या बाहेर गेल्याच कशा? हे जेलर बारीला कळत नव्हते. त्यामुळे बारी अगदी चवताळून गेला होता.

शेवटी प्रकरण हाताबाहेर जायला लागले म्हणून, त्याकाळचे भारताचे गृहमंत्री क्रॉडॉक सावरकरांशी चर्चा करायला १९१३ मध्ये अंदमानला आले. त्यानंतर सेल्युलर जेल मधील परिस्थिती बरीच सुधारली. सुधारली म्हणजे तेथील कैद्यांना माणूस म्हणून वागवले जाऊ लागले.

तुरुंगाच्या कोठडीमध्ये असताना कैद्यांना एकमेकांशी बोलायला बंदी होती. कोणी बोलायला लागले तर लगेच जमादार येऊन त्यांना शिक्षा करत असे. म्हणूनच सावरकरांनी हातातील बेड्या वाजवून संवाद साधता येईल अशी एक स्वतंत्र रोमन भाषेतील लिपी तयार केली होती. नंतर तिच लिपी गणेश सावरकरांनी देवनागरी मध्ये बसवली आणि जेलभर ही बिनतारी यंत्र कड-खट्ट-कट वाजू लागली. सर्व बातम्या इकडच्या तिकडे जाऊ लागल्या. कित्येक दिवस बारीला कळेना की हे लोक एकमेकांना भेटत नाहीत, तरी सगळ्या बातम्या सर्वांना कळतात तरी कशा?

सावरकरांनी हळू-हळू सेल्युलर जेलमध्ये प्रौढ शिक्षण चालू केले. अशिक्षित कैद्यांना सुशिक्षित राजबंदी लिहायला-वाचायला शिकवू लागले आणि सावरकर त्यांना इतिहास शिकवू लागले. सावरकरांनी खास २००० पुस्तकांचे ग्रंथालय या जेलमध्ये तयार केले.

तसेच अंदमानच्या जेलमध्ये जबरदस्तीने व दमदाटीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराचाही प्रकार फार मोठा होता त्याविरुद्ध ही सावरकरांनी बराच लढा दिला व हा सर्व प्रकार थांबवला. खोटे गुन्हे दाखल करून अंदमानात धाडलेल्या कैद्यांना त्यांनी निकराच्या लढ्याने पुन्हा हिंदुस्थानामध्ये पाठवून दिले. थोडक्यात काय तर , सावरकर तेथेही आपल्या परीने जेवढे होईल तितके देशाच्या उपयोगी पडतच होते.

आतापर्यंत सावरकरांना अंदमानमध्ये येऊन ४ वर्षे होऊन गेली होती. पण अजूनही त्यांच्यासमोर तब्बल ४५ वर्षांचा कारावास आ वासून उभा होता. अंदमानच्या रोगट हवेमुळे तब्येतही खालावत चालली होती. घरच्या माणसांची ओढ लागत होती. थोरले बंधू जवळ असून देखील दूर होते. उमेदीची वर्ष कारावासात जात होती. यातूनच वेळ मिळाला कि, सावरकरांच्या कविता तुरुंगाच्या भिंतीवर उमटत होत्या. पण पुढे काय होईल याचा काहीच अंदाज नव्हता. समोर मरेपर्यंत शाश्वत होते ते फक्त काळेपाणी आणि ती जन्मठेप.

या साऱ्यातून विनायक दामोदर सावरकर कसे बाहेर पडले आणि कसे पहिल्यापेक्षाही जास्त तेजाने तळपू लागले हे आपण पुढील भागामध्ये पाहू.

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी