सावरकर एक विचारधारा - अंदमानच्या नरकाकडे अर्थात भाग ६

मराठी HISTORYVEER SAVARKAR

Apoorv Kulkarni

1/6/20241 min read

मागील भागात आपण पाहिले विनायक दामोदर सावरकर यांना राजद्रोह आणि जॅक्सनच्या खुनाला मदत केल्याबद्दल २५-२५ वर्षे अशा दोन जन्मठेपा ठोठावण्यात आल्या होत्या. २४ डिसेंबर १९१० रोजी ह्या शिक्षेची सुरुवात झाली. त्यासाठी त्यांना प्रथम डोंगरी येथील तुरुंगामध्ये आणून ठेवले.

मुळातच सावरकरांना आपल्याला जेव्हा लंडनला पकडले गेले, तेव्हाच आपल्याला जन्मठेप होणार याचा अंदाज होताच आणि जेव्हा आपला मार्सेलिसचा प्रयत्न फसला आणि आपण परत पकडले गेलो तेव्हा आपल्याला नक्कीच फाशी होणार याचा अंदाज आला होताच. पण इथे तर त्यांना चक्क दोन जन्मठेपा झाल्या होत्या. त्याही एक संपल्यावर दुसरी. एका व्यक्तीला एकाच जन्मात दोन जन्मठेप ठोठावण्याचा हा इतिहासातील अगदी एकमेव असाच प्रसंग.

डोंगरीच्या तुरुंगात मध्ये सावरकरांना आपले पारंपारिक कपडे उतरवून कैद्याचे जाडे-भरडे कपडे देण्यात आले. विनायक दामोदर सावरकर या नावाबद्दलच ब्रिटिश सरकारमध्ये इतकी दहशत होती की, इतर कैद्यांप्रमाणे त्यांना कोणतीही सूट मिळत नसे. तुरुंगातील नियमांनुसार प्रत्येक कैद्याला दिवसभरात काहीना काही काम करणे बंधनकारक होते. त्यामुळे सावरकरांना काथ्या कुटण्याचे काम देण्यात आले. आता कविता आणि साहित्य लिहिण्याची सवय असलेले हे हात काथ्या कुटण्याचे काम करू लागले. काथ्या कुटून-कुटून दिवसाअखेर सावरकरांच्या हातातून रक्त निथळू लागे. आता हा भयानक दिनक्रम चालू झाला होता. दिवसभर काथ्या कुटायचे आणि रात्रभर त्या अंधारकोठडीत पडून राहायचे. ना तेथे बोलायला कोणी असायचे, ना वाचायला कोणते पुस्तक मिळायचे. त्यांच्या सोबतीला होता तो म्हणजे फक्त आणि फक्त एकांतवास. हा असला एकांतवास म्हणजे एक प्रकारचे निशब्द मरणच.

असेच एके दिवशी एक हवालदाराला आला आणि म्हणाला, ‘चलो साहब बुलाता है’. मुळात या काळ कोठडीतून बाहेर पडायला मिळते आहे हाच आनंद, त्यात साहेब कशाला का बोलवेना म्हणून सावरकर कचेरीत आले तर समोर उभी होती यमुना (सावरकरांची पत्नी) आणि तिचा भाऊ. त्यांना पाहून सावरकरांना अगदी आपले अवसानच गळल्यासारखे झाले. कारण आज अक्षरशः ५ वर्षांनी सावरकर यमुनेला भेटत होते. दोघांनाही एकमेकांची अवस्था पाहून गहीवरुन आले होते. बोलण्यासारखे खूप काही होते. पण, एकमेकांना पाहून शब्दच फुटत नव्हते. जे काही एकमेकांना सांगायचे ते डोळ्यात दाटले अश्रूच सांगून जात होते. अशातच सावरकर यमुनेला समजावू लागले, 'ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईल. तोवर जर कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला. तर असा विचार करा की, मुला-मुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच संसार म्हणायचे असेल तर, असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृत्यकार्य झालो आहोत. आपण आपली चार चूलबोळकी फोडून टाकली. पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी कदाचित सोन्याचाही धूर निघेल'. एवढं बोलणे होईपर्यंत तेथे उभा असलेला हवालदार ओरडला ‘चलो वक्त खत्म हो गया’. त्यामुळे पाणावलेले डोळे घेऊनच बेड्यांचा आवाज करत सावरकर कोठडीत परतले.

डोंगरीच्या तुरुंगातून सावरकरांना पुढे भायखळा आणि तेथून ठाण्याच्या तुरुंगात नेण्यात आले. ठाण्याच्या तुरुंगामध्ये सावरकरांना ठेवण्यासाठी एक भाग संपूर्णपणे मोकळा करण्यात आला होता. ठाण्याच्या तुरुंगात अंदमानला नेण्याचे सर्व कैदी एकत्र केले जात व तेथून त्यांना पुढे अंदमानसाठी रवाना केले जाई. त्यावेळी ठाण्याच्या तुरुंगात सावरकरांचे सर्वात धाकटे भाऊ म्हणजे नारायणराव सावरकरही होते. पण त्यांची आणि सावरकरांची भेट मात्र होऊ शकली नाही.

थोड्याच दिवसात ठाण्याच्या तुरुंगामध्ये ‘चलान’ आले. हे ‘चलान’ म्हणजे महाभयंकर प्रकरण. ‘चलान’ म्हणजे अंदमानला नेण्यात येणार्‍या सर्व कैद्यांना एकत्र करण्याचा कार्यक्रम. सावरकरांची वैद्यकीय तपासणी झाली आणि काखेत अंथरूण, हातात ताट-वाटी आणि पायात बेड्या या अवस्थेत सावरकरांनी ‘चलान’ मध्ये प्रवेश केला. हे ‘चलान’ ठाण्याहून मद्रासला रेल्वेने जाणार होते. पण याही प्रवासामध्ये सावरकरांना बाकी कैद्यांपेक्षा वेगळ्या आणि जास्त सुरक्षा असलेल्या डब्यामध्ये ठेवण्यात आले होते. कारण ब्रिटिश सरकार अजूनही ‘मार्सेलिस’ विसरू शकत नव्हते. इतक्यात तेथे काही इंग्रज आले आणि ते आपल्या बायकांना-मुलांना दाखवत होते, ‘There he is, that is Savarkar’. कारण त्याकाळी सावरकर हे नाव अगदी जगभर गाजत होते.

हे ‘चलान’ आता मद्रासला येउन पोहोचले. येथून पुढे सारा प्रवास बोटीने. ‘महाराजा’ नावाच्या बोटीने कैद्यांना अंदमानला घेऊन जाण्यात येत असे. या ‘महाराजा’ वर चढणे म्हणजे जिवंतपणी तिरडीवर चढण्यासारखे होते. कारण ही वाट प्रत्येक्ष नरकाकडेच जात होती. या बोटीमध्ये जेमतेम २५ कैदी बसू शकतील एवढ्या पिंजऱ्यात ५० ते ६० कैदी अगदी कोंबून-कोंबून भरले जात. याच कोंदट अशा जागेमध्ये सर्व जण दाटीवाटीने बसलेले असत. त्याच पिंजऱ्याच्या कोपऱ्यांमध्ये आपले दैनंदिन विधी उरकण्यासाठी एक पिंप ठेवलेले असे. असा हा सारा अगदी किळसवाणा प्रकार.

अखेर ४ जुलै १९११ रोजी ‘महाराजा’ अंदमानच्या किनाऱ्याला लागली. तेथून साऱ्यां कैद्यांना अंदमानच्या ‘सेल्युलर जेल’ कडे नेण्यात आले. मुख्य दरवाज्यापाशी साऱ्या कैद्यांची गणती करण्यात आली आणि दरवाजा बंद करून घेण्यात आला. सावरकरांच्या मनात विचार येऊन गेला, ‘हा दरवाजा आता आपल्यासाठी थेट ५० वर्षांनीच उघडणार’. याच ‘सेल्युलर जेल’ चा जेलर होता अत्यंत क्रूर म्हणून ओळखला जाणारा एक आयरिश गृहस्थ बारी. या अंदमानच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेत अंघोळ करण्याचाही प्रकार एकदम विचित्रच होता. येथे फक्त तीन कटोऱ्यांमध्ये आंघोळ करावी लागे आणि तीही समुद्राच्या खारट पाण्याने. सावरकरांना ‘सेल्युलर जेल’ मधील ७ नंबरच्या चाळीच्या खोली नंबर ४२ मध्ये ठेवण्यात आले होते. येथेही सावरकरांना या चाळीमध्ये ठेवायचे म्हणून खास ही संपूर्ण चाळ रिकामी करण्यात आली होती.

अंदमान मध्ये राहणारे इंग्रज आणि विशेषतः इंग्रज स्त्रिया हे सावरकर कसे दिसतात बघायला खास जेलर बारीची विशेष परवानगी घेऊन सावरकरांना पाहायला येत असत.

सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश सावरकर देखील याच तुरुंगामध्ये आपली काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. पण अजून पर्यंत त्यांची आणि विनायकाची भेट मात्र होऊ शकली नव्हती. कारण ते तुरुंगाच्या नियमांच्या विरुद्ध होते. मुळात गणेश सावरकरांना आपला धाकटा भाऊ देखील येथे आला आहे हेच माहीत नव्हते.

परंतु तिथलाच एक जमादार मात्र सावरकरांच्या बाबतीत जरा दयाळू होता. संध्याकाळी सर्व कैद्यांच्या गणतीच्या वेळेस सावरकरांना बरोबर त्यांना त्यांच्या मोठ्या बंधूंचा दर्शन होईल अशा ठिकाणी नेऊन उभे केले. प्रथम तर दोघांनी एकमेकांना ओळखलेच नाही. कारण अगदी ५-६ वर्षांनी हे एकमेकांना समोरा-समोर पहात होते. विनायकाला येथे पाहून गणेशराव सावरकरांवर तर ब्रम्हाण्डच कोसळले. दोघांनाही एकमेकांशी खूप काही बोलायचे होते, पण ते शक्य नव्हते. त्यामुळे अश्यात अबोलपणानेच एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या.

सावरकरांची अंदमानची शिक्षा आता खऱ्या अर्थाने चालू झाली होती. पण या काळ्या पाण्यासारख्या शिक्षेतही शांत राहतील ते सावरकर कसले ? त्यासाठी त्यांना अगदी कोलू फिरवण्यासारख्या अमानवी शिक्षा देखील झाल्या. पण येथेच भिंतीचा कागद आणि दगडाचा किंवा काट्याचा पेन करून ‘कमला’ सारखे महाकाव्य देखील त्यांनी येथेच रचले.
अश्या अनेक चित्तथरारक कहाण्या आपण पुढील लेखात पाहू.

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी