सावरकर एक विचारधारा - अनंताकडे प्रवास अर्थात भाग 10

मराठी HISTORYVEER SAVARKAR

Apoorv Kulkarni

1 min read

मागील लेखामध्ये आपण सावरकरांचे रत्नागिरीतील छुपे राजकारण व खुले समाजकारण पाहिले. मुळात जन्मजात देशप्रेमाने भारलेले हृदय आणि आजन्म घेतलेले देशसेवेचे व्रत त्यांना कुठेही व कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्थ बसण्याची परवानगी सतत नाकारतच होते. त्यामुळे ते अखंड कार्यरत होतेच. परंतु, हे व्यक्तिमत्व ही असे बहुरंगी व अनेकविध पैलूंनी भरलेले होते की, त्यांना फक्त स्वातंत्र्यवीर, फक्त समाजसुधारक, फक्त लेखक किंवा फक्त कवी ही काही ठराविक लेबलं लावणे तसे संकुचितपणाचे ठरेल आणि ते इष्ट ही होणार नाही.

सावरकरांचे साहित्यातील योगदान देखील अगदी वाखाणण्याजोगे आहे. भारतीय देवनागरी लिपी व भाषा या आधुनिक छपाई तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देखील टिकाव्यात, यासाठी त्यांनी या भाषांसाठी म्हणून कित्येक नवीन शब्द शोधले. या भाषांमध्ये छपाईसाठी सोपी अशी नवीन लिपी तयार केली. त्याबरोबरच आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वतःचे असे जवळ-जवळ १२,००० पानांचे साहित्य लिहिले.

साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान देण्यात आला होता. या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषेमध्ये अनेक आधुनिक बदल सुचवले. त्याबरोबर ते असेही म्हणाले की, ‘आता लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’. कारण, साहित्य हे त्या-त्या समाजाचे प्रतिबिंब असते आणि हे साहित्य पुढे न्यायचे असेल तर आधी त्या साहित्याचे व ते निर्माण करणाऱ्यांचे संरक्षण करण्याची क्षमता आपल्या बाहुंमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपली संस्कृती व साहित्य अबाधित राहील असे सावरकरांचे प्रतिपादन होते.

मूलतः राजकारणी आणि लोकनेता या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रचंड मोठा असा भेद आहे. त्यातही दूरदृष्टीचा लोकनेता असणे ही तशी दुर्मिळच बाब. पण सावरकरांमध्ये या दोन्ही गोष्टी अगदी ओतप्रोत भरलेल्या होत्या. या लोकनेत्याच्या दूरदृष्टीची काही उदाहरणे द्यायची म्हटले तर, १९४८-४९ च्या दरम्यान भारत एक स्वयंपूर्ण राष्ट्र व महासत्ता होण्यासाठी त्यांनी काही सूचना व मुद्दे सरकारला व लोकांना सांगितले होते. त्यात ते म्हणत होते की,

  • आपण चीनपासून सावध राहिले पाहिजे’ आणि आजही आपण आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या चीनशी विविध आघाड्यांवर सामना करतच आहोत.

  • एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो’ ही आवश्यकता आहे हे त्याकाळीच सूचित केलेले वाक्य पुढे १९७१ साली पश्चिम आणि पूर्व (आत्ताचा बांगलादेश) पाकिस्तान वेगळा करून इंदिरा गांधी यांनी सिद्ध केलेच.

  • भारत देशाच्या सीमा निश्चित करून घ्या’ आणि कित्येक वर्षे चीन,पाकिस्तान, बांगलादेश,नेपाळ यांच्याबरोबर आपला सीमा संघर्ष सतत सुरूच आहे किंवा आत्ता-आत्तापर्यंत तो होता.

  • भारताला अण्वस्त्रधारी अर्थात Nuclear State बनवा’ परंतु तेव्हा काही लोकांच्या अट्टाहासापायी ही सूचना टाळल्यामुळे नंतर NPT (Non-Proliferation of Nuclear Weapons) मध्ये स्थान मिळण्यासाठी आपल्याला किती आणि कसा खटाटोप करावा लागला हे सर्वज्ञ आहे.

  • समाजातील शिक्षक आणि संरक्षक दल हे दोन घटक समृद्ध करा या दोघांवरच समाजाचा पाया उभा असतो’ ह्याची सद्य परिस्थिती काय आहे हे प्रत्येकाने आपले आपण तपासून पाहणेच जास्त योग्य ठरेल.

अशातूनही १९४८ साली झालेल्या गांधीहत्येमध्ये आकस बुध्दीने विनाकारण सावरकरांना गोवण्यात आले. परंतु त्यावेळी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने सावरकरांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. असे असूनही पुढे १९६६ साली आलेल्या कपूर आयोगाने ‘सावरकर व सावरकर वाद्यांचा कट’ असा उल्लेख करून परत गोंधळ उडवला. परंतु सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सरकारने अपीलच केले नाही. त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरला.

यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा की त्यावेळी केंद्रीय कायदामंत्री असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांचे वकील भोपटकर यांना खटला चालू असताना खासगी मध्ये सांगितले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कोणताही आरोप सत्य नाही. थातूर-मातूर पुरावा रचण्यात आला आहे. कॅबिनेटमधील सदस्यांचे म्हणणे होते की, सावरकरांना एवढातेवढ्या संशयावरून आरोपी करू नये. पण अखेर एका ज्येष्ठ नेत्याच्या आग्रहामुळे त्यांना या खटल्यात गोवण्यात आले आहे. सरदार पटेलांचे ही त्यांच्या पुढे काही चालले नाही. तुम्ही खटला निर्भयपणे लढवा. जय तुमचाच आहे.’ तसेच या अभियोगाची सुनावणी सुरू झाल्यावर डॉ. आंबेडकर, ‘चला या बहादूर माणसाची ट्रायल पाहायला कोर्टात जाऊ.’ म्हणून कित्येकदा कोर्टातही जात असत. अनेक विधिमंत्री,विधी पंडित आणि बऱ्याच उच्चपदस्थांचे लक्ष या अभियोगाकडे लागले आहे. हे दाखवण्यासाठी ते न्यायालयात आवर्जून हजर राहत असत. त्याबरोबरच नंतर ‘विशेष न्यायालयाचे निर्णय कपूर चौकशी आयोग बदलू शकत नाही’ असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे सावरकरांवरचा हा आरोप निष्फळ ठरला.

यानंतर १९५२ साली ‘अभिनव भारत’ आणि लंडन मधील ‘फ्री इंडिया सोसायटी’ ह्या सावरकरांच्या गुप्त क्रांतिकारी संघटना त्यांनी विसर्जित केल्या. कारण स्वतंत्र भारताचे या संघटनांचे उद्दिष्ट आता साध्य झाले होते. त्याच्या सांगता समारंभात ते म्हणाले, ‘आता या संघटनेचे साध्य सिद्धीस गेले आहे. परकीय शत्रूच्या शस्त्र अत्याचाराविरुद्ध लढताना आवश्यक असलेली क्रांतीकारी प्रवृत्ती आता आपण कायद्याच्या व घटनात्मक मार्गात रूपांतरित केली पाहिजे.’

यानंतरही सावरकरांचे बरेच समाजकार्य आणि ‘हिंदू महासभा’ याचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे समाजकारण, राजकारण हे चालूच होते. परंतु ८ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांच्या पत्नीचा म्हणजे यमुनाबाई सावरकरांचा मृत्यू झाला. तसेच आता वयोमानानुसार विनायक सावरकरांना देखील प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे आता आपला हा देह स्वतःला व समाजालाही भारभूत झालेला आहे. आता आपला हा देह समाजाच्या उपयोगी पडू शकत नाही. म्हणून १ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्नत्याग केला व हळू-हळू प्रयोपवेशनसुरु केले. याच काळात त्यांनी या प्रयोपवेशनाचे अत्यंत शास्त्रशुद्ध व व्यवस्थित प्रतिपादन ‘आत्महत्या आणि आत्मार्पण’ या आपल्या लेखांमध्ये विस्तृतरीत्या केले. अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या मुंबईतल्या घरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अनंतात विलीन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभर पसरली. लाखों लोकांनी आपल्या या दूरदृष्टीच्या नेत्याला अखेरचा निरोप द्यायला गर्दी केली.

२६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी विनायक दामोदर सावरकर हे सदेह आपल्याला अंतरले. परंतु त्यांनी प्रज्वलित केलेले विचार आणि त्याचबरोबर केलेले आचार आपल्यामध्ये एका विचारधारेच्या स्वरूपात अनंत काळापर्यंत प्रज्वलित राहतील.

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी