सावरकर एक विचारधारा - भाग १
या मालिकेत आपण विनायक दामोदर सावरकर यांच्या बहुआयामी व व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजूंचा सखोल आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्य संग्रामातले त्यांचे योगदान, क्रांतिकारी कार्य, आणि 'हिंदुत्व' या त्यांच्या विचारसरणीचा विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. सावरकरांच्या लिखाणातून आणि त्यांच्या क्रांतिकारक उपक्रमांतून उलगडणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी आणि वादग्रस्त आयुष्याचे विश्लेषण करण्यात येईल.
HISTORYमराठी VEER SAVARKAR
Apoorv Kulkarni
1/11/20241 min read


‘सावरकर’ हे शब्द कानी पडले की बऱ्याच जणांचे कान टवकारले जातात. काहींचे शंकेने, काहींचे तिरस्काराने, तर काहींचे आदराने. ‘सावरकर’ म्हटले की काहीजण तर अगदी चवताळूनच उठतात. एकाच व्यक्तीमत्वाबद्दल इतक्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया येणे तसे दुर्मिळच.
पण ‘सावरकर’ या शब्दाबरोबर या प्रतिक्रिया येतातच. या इतक्या संमिश्र प्रतिक्रिया येणारे कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि भारतीय राजकारणातील ही एकमेव व्यक्ती असावी.
आपण बरेच वेळा याला काँट्रॅव्हेनशल (contraventional) असे label लावतो. पण अर्थातच आपण कधी त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत नाही. खोलात सोडा पण आपण तो विषय किमान समजून घेणेही टाळतो. तर आपण या लेखमालेत नक्की ‘सावरकर’ म्हणजे कोण? ‘सावरकर’ या व्यक्तीने नक्की काय केले? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ‘सावरकर’ हा शब्द एका व्यक्तीमधून एक विचारधारा का, कधी व कसे बनला?
‘विनायक दामोदर सावरकर’ या नावाभोवती त्यांनी स्वतः लिहिलेले बारा हजार (१२,०००) पानांचे साहित्य व दुसऱ्यांनी त्यांच्यावर लिहिलेले अगदी नक्की आकडा सांगता येत नसला तरी कित्येक हजारोंचे पानांचे साहित्य लिहिलेले आहे. तसेच ‘ने मजसिने परत मातृभूमीला....’, ‘अनादी मी अनंत मी..... ’, ‘कमला’ यांसारख्या प्रसिद्ध कविताही आहेत. एवढेच नाही तर त्यांनी इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठीत आणि हिंदीत पर्यायी शब्द शोधला आणि खऱ्या अर्थाने भाषेचे वैभव वाढवले आणि भाषा समृद्ध केली. आज आपण Budget ला वापरणारा ‘अर्थसंकल्प’, Report ला ‘अहवाल’, Number ला ‘क्रमांक’, Director ला ‘दिग्दर्शक’ अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील.
‘वि.दा.सावरकर’ हे नाव बहुतांश जणांना लक्षात असते ते त्यांच्या अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमुळे. एकाच व्यक्तीला एकाच जन्मात दोन जन्मठेप मिळालेला हा जगातील एकमेव प्रकार आपल्याला यांच्या बाबतीत पाहायला मिळतो. या अंदमानच्या शिक्षेच्या काळातही त्यांनी ‘कमला’ हे दहा हजार ओव्यांचे काव्य कारागृहातील भिंतींवर लिहिले. तसेच अंदमानला जाताना ‘महाराजा’ या बोटीवरचेही त्यांचे प्रसंग अत्यंत ह्रदय आहेत.
या विनायकाचा स्वातंत्र्यवीर होण्यामागचे प्रेरणास्थान काय? तो प्रसंग कोणता? तारुण्यामध्ये त्यांनी लंडनमध्ये पेटवलेली क्रांती कोणती?
त्या क्रांतीतून तयार झालेले क्रांतिवीर कोण ? ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या त्यांच्या ग्रंथाचा भारतीय राजकारणावर कोणता महत्वाचा परिणाम झाला? सावरकरांनच्या ज्या इंग्रजांना दिलेल्या माफीनाम्याबद्दल इतकी चर्चा होते तो नक्की काय होता? सावरकरांचे ‘हिंदुत्व’ काय होते?
ह्या साऱ्याचा आढावा आपण या १० लेखांच्या लेखमालेत पाहू.
- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी