नव वर्षं

POEMSमराठी MAY 2024

5/31/20241 min read

म्हटलं तर नवीन वर्षं येतं, नाहीतर जुनेच पान पालटते

अहंकाराचा दिवस, मानापमानाचे महिने,

म्हटलं तर मन मागे सारतं,

नाहीतर जुन्याच आठवणींच्या,

दुष्ट चक्रात अडकून बसतं

दुखावलेली मनं, दुरावलेली नाती,

म्हटलं तर सगळंच सांधलं जातं,

नाहीतर विस्कटलेल्या घड्यांचं बोचकं,

फडताळात जाऊन बसतं

हरवलेली माणसं, गमावलेले क्षण,

म्हटलं तर पुनः भेटतात,

नाहीतर भावना हरपलेल्या मनाच्या,

मेंदूत दडी मारून राहतात

नवीन वर्षांत जगून घेऊ

विसरून सगळी नकारात्मकता,

आपलेच आयुष्य आपण जगूया,

नव्याने जगता जगता

--स्नेहा वैद्य