एका योध्याची भावनिक बाजू: वीर सावरकर
सदर लेख २८ मे २०२१ च्या तरुण भारत या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
मराठी HISTORYVEER SAVARKAR
Apoorv Kulkarni
1 min read
योद्धा! योद्धा म्हटले की, आपल्यासमोर येते ते म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्व. कधीही न खचणारे, कधीही न डगमगणारे, कधीही व्यथित न होणारे. परंतु, इतर व्यक्तींप्रमाणे त्यांनाही कधी होत असेल का आनंद-दुःख, ते ही होत असतील का कधी व्यथित ?
अर्थातच आपण जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन पाहतो, तेव्हा त्यामध्ये अत्यंत वादळी असे साहसी प्रसंग आहेत, क्रांतिकारी कारवाया आहेत, परंतु त्याच बरोबरीने कित्येक हृदय आणि भावुक प्रसंग देखील आहेत. तेव्हा आज आपण जाणून घेउयात या योध्याची ही एक emotional बाजू.
विनायकाची आई त्याला सोडून गेली तेव्हा ते दुःख कळण्याइतका कदाचित तो मोठा नव्हता. परंतु एरवी अभेद्य खडकासारखा दिसणारा हा विनायक जेव्हा आपल्या मातृभूमीला सोडून बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला निघाला तेव्हा अगदी गहिवरून गेला होता. हा मातृभूमीचा आणि आपल्या कुटुंबाचा, छोट्या मुलाचा प्रभाकराचा वियोग त्यांना देखील नकोस झाला होता. परंतु उराशी बाळगलेले स्वप्न या दुःखापेक्षा जास्त मोठे होते. परंतु याहूनही भयंकर असे प्रसंग आपल्याला त्यांच्या लंडनमधील वास्तव्यात पाहायला मिळतात. त्याचा पहिला मुलगा प्रभाकर हा चार वर्षाचा असताना त्याचे निधन झाले ही बातमी त्यांना लंडन मध्ये असताना कळली आणि त्यांच्यावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. ज्या आपल्या मुलाला आपण नीट पाहिले देखील नाही, त्याच्याबरोबर चार क्षण देखील घालवू शकलो नाही. याचे दुःख अपार होते तेव्हाच त्यांनी ‘प्रभाकरास’ ही कविता त्याच्या स्मरणार्थ रचली.
त्यानंतर काहीच काळात हिंदुस्तानामध्ये त्यांचे थोरले भाऊ गणेशपंत सावरकर यांना काळ्या-पाण्याची शिक्षा तर धाकट्या भावाला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ही बातमी ऐकल्यावर तर सावरकरांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिकडे आपली वाहिनी आणि पत्नी या एकट्या पडलेल्या, ब्रिटिश सरकारने घरातील अगदी भांड्यांसकट घर जप्त केलेले. परंतु या सर्वांमध्ये विनायक मात्र लंडनमध्ये अडकून पडलेला. आपल्या मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ झालेला. अश्या अवस्थेत ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसला असताना हा विनायक सागराला उद्देशून म्हणतो आहे, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’, म्हणजे पाहा बरं का, इथे विनायकाचे मन तळमळत नाही तर प्राण तळमळतो आहे. तेव्हा अभेद्य मनाचा हा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो.
असेच प्रसंग त्यांच्या पुढील अंदमानच्या शिक्षेत देखील आले, अंदमानातील अमानुष आणि अमानवी छळाला कंटाळून एकवेळ तर अगदी आत्महत्येचा देखील विचार त्यांच्या मनात येऊन गेला. त्या काळकोठडी मध्ये सामान्यतः जगणे आणि एक-एक दिवस पुढे ढकलणे देखील जिथे कठीण आहे अश्या ठिकाणी भिंतीचा कागद आणि काट्याची लेखणी करून ‘महाकाव्य’ रचणारे वीर सावरकर हे एकमेवच.
याचाच अर्थ काय तर ही महान किंवा थोर माणसे देखील कधीतरी खचतात, हताश होतात, घाबरतात. परंतु सामान्य आणि असामान्य व्यक्ती यातील फरक म्हणजे त्या दुःखात, हताशेत घालवलेला काळ. आपण कित्येक दिवस, महिने त्यातच घालवतो, परंतु ही असामान्य माणसे लगेच त्यातून बाहेर येउन आपले उच्च ध्येय गाठायच्या मागे लागतात. आपण त्यांच्याकडून हाच गुण आणि झपाटलेपण शिकायला हवे.
- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी