माझी जाई जुई गं पुरेशी

POEMSमराठी MAY 2024

5/31/20241 min read

माझी जाई जुई गं पुरेशी

नको मोगरा दूरचा

बाई, हवा गं कशाला?

वळेसर सुरंगीचा

माझे चतकोर आभाळ

मला पुरून उरते

रानोवनीचे मोकळे

बाई, दडपण येते

माझ्या जात्यात चार दाणे

मोती जोंधळ हांसती

नको पकवान्नाची रास

माय-भाकर पुरती

माझी वाट अवखळ

पण पाऊल जपते

चमकत्या रस्त्यापरी

नाही, पाय भाजविते

माझा इवला, मितीचा

थोडा नाही तो रीतीचा

पण, जपते उराशी

माझा संसार प्रीतीचा

माझी जाई - जुई गं पुरेशी..

--Madhura tamankar