आज भादाचा पाडवा
गणेशोत्सवानिमित
मराठी AUGUST 2024POEMS
9/11/20241 min read


सरली श्रावण निळाली
आज भादाचा पाडवा
चैतन्यात मिसळे चैतन्य
किती उल्हास दाटला..
श्रावणाच्या पायावर
आणि एक पायठण
वर चढला कळस
गणरायाचे आगमन..
नाना फळांनी - फुलांनी
भरला बाजार सगळा
किती मखरे , तोरणे
नवा सजला सोहळा..
केवडा, मोगरी नि शमी
किती किती नाना पत्री
हार दुर्वांचा एकवीस
जास्वंदी कमळांची जत्री..
कद , शालू जरतारी
आले मिरवीत खाली
गंध , धूप , अत्तराचा
राहे दरवळ भवताली..
आले सगे नि सोयरे
सारे जमले एकठायी
करावयास अर्पण
आपुली सेवा तुझ्या पायी..
लख्ख झाले घरदार
तुझे सिध्द झाले स्थान
दोन दिसापुढे मग
होईल आता आगमन..
रंगतील रांगोळ्या सुरेख
डहाळ्या आंब्याच्या लागतील
दारापुढे फुला -पानांच्या
पायघड्याही घालतील ..
आणि वाजत गाजत
आमुचे गणराय येतील
ढोल , ताशे नि लेझिम
आसमंत दुमदुमेल..
येईल मखरास शान
होईल मुर्ती विराजमान
मुकूट , आयुधे , अलंकारे
तुझे सजेल रूप छान..
किती स्नेहाळ , साजिरी
असेल तुझी सुरेखशी मुर्ती
ठायी तुझ्याच नांदते
आमुची प्रिती आणि भक्ती..
षोडपोचारे तूज पुजेन
यथा शक्ती , यथा भक्ती
तव नावाचे चालेल भजन
रंगतील आरत्या दिन राती..
पंचपक्वानांनी सिध्द
होईल नैवेद्याचे ताट
शुभ्र , सुबक ठेंगण्या
मोदकांचा
त्यात भारी थाट..
तुझे वात्सल्य नयन
ठेवील आम्हांवर कृपा दृष्टी
आसुसलो झेलायास
आता , हि आनंद वृष्टी..
आणि मागणे न काही
असाच करी वास माझ्या घरी
जरी चुकली माकली
असेल , सेवा माझी खरी..
आता लागलीसे फार ओढ
कधी चवथ येईल
कुंकवाच्या पावलांनी
येईल सौभाग्य घरोघर
सौभाग्य घरोघर..
--- सौ.मधुरा ताम्हनकर