स्वातंत्र्य एक बंधन

१५ ऑगस्ट २०२१. आपण भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव साजरा करतोय. या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान केले. हे स्वातंत्र्य आहे तरी काय? ते एवढे मौल्यवान का आहे?, एवढे बहुमूल्य स्वातंत्र्य आपल्याला लाभले, त्याची किंमत आणि अर्थ आपण खरोखर समजतो काय? बरेचदा असे लक्षात येते कि बरेच लोक स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ स्वैराचार याच अर्थाने वापरतात. आम्हाला टोकणारे कोणी नाही, म्हणजे आम्ही आमच्या मर्जीचे राजे. जसे मनात येईल तसे वागणार. कुठल्याही नियमांचे पालन करणार नाही. पण हे अजिबात बरोबर नाही. नेल्सन मंडेला म्हणतात, “For to be free is not merely to cast off one's chains, but to live in a way that respects and enhances the freedom of others.”

HISTORY

5/10/20241 min read

स्वातंत्र्य म्हणजे बंधन, ऐकायला जरा विचित्र वाटेल कदाचित. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वत: स्वत:वर घातलेले बंधन आहे. हे बंधन आहे नैतिकतेचे, तर्कशुद्धतेचे. "जीवनमूल्ये" या पुस्तकात प्रो. प्र. ग. सहस्रबुद्धे यांनी "स्वतंत्रता" म्हणजे काय याचे फार सुंदर विश्लेषण केले आहे. स्वतंत्र म्हणजे जो इतरांच्या बंधनात नाही, परावलंबी नाही आणि ज्याला स्वतःच्या तंत्राने वागता येते तो, किंवा जो स्वत:चे नियम आखून त्याप्रमाणे वागतो तो. परंतु, स्वत:च्या तंत्राने म्हणजे स्वैर आणि बेताल वागणे नाही, तर शिस्तबद्ध पद्धतीने वागणे, स्वत:च्या नियमात राहणे. हे नियम स्वत:च्या हितासाठी असावेत, त्याबरोबरच ते इतरांसाठी हानिकारक नसावेत. जर स्वत:च्या तंत्राने माणूस कसेही स्वैरपणे वागू लागला तर ते कुतंत्रच ठरेल. त्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही.


जगात सगळ्यात जास्त स्वतंत्र कोण? या प्रश्नाचे उत्तर "परमेश्वर" असेच येईल. तोच फक्त प्रत्येक गोष्ट त्याच्या इच्छेनुसार करू शकतो. परमेश्वर स्वतंत्र आहे, हे खरे, पण त्याच्या सर्व कृती अगदी शिस्तबद्ध असतात. जसे सृष्टीचे ऋतुचक्र, जीवनचक्र त्याने किती संतुलितपणे आखलेले आहे. त्यात कुठेही तो बदल करत नाही. सूर्योदय, सूर्यास्त या रोजच्या किती नियमितपणे अव्याहत सुरु आहेत. त्या तशाच घडत राहाव्यात हि त्या जगन्नाथाची जबाबदारी आहे. या कृतींचा ताल जरा जरी चुकला तर आपल्यावर मोठे संकट उद्भवेल. त्याचप्रमाणे जर कुठलेही बंधन नसेल तर माणसाचे वागणे बेताल होऊ शकते आणि त्याच्यावर संकट येऊ शकते. आपले आयुष्य सुखकर व्हावे म्हणून, समाजात आपल्याला मानमान्यता मिळावी म्हणून आयुष्यात वेगवेगळी बंधने पाळावी लागतात, कधी वेळेचे बंधन असते तर कधी वागणुकीचे. आणि हे बंधन जर आपण मान्य केले तर आपण स्वतंत्र, नाहीतर बेजाबदार किंवा बेताल. नदी समुद्राकडे वाहण्यास स्वतंत्र आहे, पण तिचा प्रवाह जेव्हा दोन तटांचे बंधन पाळून समुद्राला जाऊन मिळतो, तेव्हा तिच्या किनाऱ्यावरचे जीवन समृद्ध होत जाते. नाहीतर प्रलय झालाच समजा. आपली पृथ्वीच बघा, किती लयबद्ध तालबद्ध आहे तिचे फिरणे. ती आपल्या कक्षेची मर्यादा न सोडता, सूर्यमालेत अगदी शिस्तीत फिरत असते.

थोडक्यात काय तर स्वातंत्र्य म्हणजे बेताल वागणे नाही, तर शिस्तबद्ध पद्धतीने वागणे. स्व-तंत्र याला थोडक्यात आपण "सेल्फ रिलायंट अँड सेल्फ डिसिप्लिन्ड" म्हणणे अधिक योग्य ठरेल. पण हे लक्षात घ्यायला हवे कि, मिळणाऱ्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही तेवढीच मोठी असते.
देशाचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने टिकवून ठेवण्यासाठी जेवढी सक्षम नेतृत्वाची गरज असते तेवढीच सुजाण, सजग नागरिकांची सुद्धा. अनेक भाषा, अनेक प्रथा अनेक प्रकारच्या वेशभूषा असलेला हा आपला देश. "विविधतामे एकता" हा आपला नारा. पण आज एकविसाव्या शतकात सुद्धा, आपण मनाने समृद्ध, स्वतंत्र झालेले आहोत का? हा विचार करायला हवा. वर्णभेद, जातीभेद,भाषाभेद, प्रांतभेद हे सगळे विसरून "हिंदुस्थानचा" एक सच्चा नागरिक होऊन आपण देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत आपलाही खारीचा वाटा उचलायला हवा. आपल्या देशाचे नाव बदनाम होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. देशविरोधी, समाजविघातक संदेश असतील तर ते पसरवू नयेत, शेयर करू नयेत. यात नुकसान देशाचे आणि पर्यायाने आपलेच आहे. येथे प्रसार माध्यमांची जबाबदारी खूप मोठी आहे. ही माध्यमे देश विघातक नाही तर देश विधायक व्हायला हवीत.

आज आपल्याला गरज आहे, ती तर्कशुद्ध विचारपद्धती अवलंबण्याची, तसेच आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणण्याची. नुकतेच सुरेशकाकांचे ज्ञानेश्वरीवरचे प्रवचन ऐकत होते आणि कुठेतरी जाणवून गेले कि ज्ञानेश्वर माउलींनी जे गणेशाचे रूप प्रारंभी वर्णिलेले आहे, ते रूप आपण सगळ्यांनी आज जाणून घेण्याची गरज आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचे "ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या " असे वर्णन करताना ज्ञानेश्वर अगदी रंगून जातात, त्यांची प्रतिभाच अलौकिक. पण त्या गणरायाच्या रूपाचे वैशिष्ट्य, "तरी तर्कु तोचि फरशु | नीतिभेदु अंकुशु |" ते अंकित करतात. तर्कशुद्धता आणि नैतिकता यांचे जीवनातील महत्त्व ते गणपतीच्या हातातील आयुधांद्वारे आपल्याला दाखवून देतात. हे रूप आपण लक्षात घ्यायला हवे. नीतीचा अंकुश आमच्या वागण्यावर असला तर, नैतिक काय अनैतिक काय हे ठरवता येईल आणि आपोआप जबाबदारी नीट पार पाडता येईल. तसेच चूक आणि बरोबर यातला फरक करण्यासाठी, जसा त्या गजाननाच्या हाती परशु आहे तसा तर्करूपी परशु आम्ही आपल्या मनात बाळगायला हवा. जर खरे स्वातंत्र्य उपभोगायचे असेल, तर हा परशु आणि अंकुश विसरून चालणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींचे ते गजाननाचे रूप स्मरुया आणि त्या गणेशाला "आम्हाला स्वातंत्र्याची बुद्धी दे" अशी प्रार्थना करूयात.

आपल्याला मोठ्या सौभाग्याने मिळालेले हे स्वातंत्र्य आपण जबाबदारीने जपले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र होईल . गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, "Where the mind is without fear" ज्यात ते स्वतंत्र भारताचे अतिशय भावपूर्ण चित्र रंगवतात. प्रथम मूळ कविता आणि तिचा स्वैर अनुवाद करण्याचा माझा एक प्रयत्न.

Where the mind is without fear and the head is held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
Where words come out from the depths of truth;
Where tireless striving stretches its arms towards perfection;
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is LED forward by thee into ever-widening thought and action;
Into that heaven of freedom, my father, let my country awake.

My Interpretation and Attempt of Translation in Marathi:


भयमुक्त जिथे मन, आणिक उन्नत माथा,
असतील कवाडे खुललेली ज्ञानाची,
विस्कळीत जग ना असेलही झालेले
भिंतीही घरांच्या भासतील ना कारा...

शब्दातून साऱ्या केवळ उमटे सत्य,
कार्यातही साऱ्या लगाव अन सातत्य
बनतील जिथे ना पर्वत कधी रुढींचे
ना मिटेल कधीही जेथील विवेक धारा...

कृत्य आणखी विचार विस्ताराया
तू प्रेरक व्हावे, मार्ग आम्हा दावाया
हे प्रभो, रची तू स्वर्गच आमुच्या हृदयी,
स्वर्गातच स्वातंत्र्याच्या त्या जागी मातृभू होई,
स्वर्गातच स्वातंत्र्याच्या त्या जागी मातृभू होई..


ये दिल मांगे मोअर ssssss...........

- डॉ. अंजली देशपांडे

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook