केरी
POEMSमराठी JUNE 2024
7/4/20241 min read
खेकड्याच्या तिरप्या चालीसारखा , तिरका पाऊस कोसळतोय , अधुनमधून वाऱ्याची थंडगार झुळूक येतीय , मुंबईसारख्या शहरातही जरा पंख्याला आराम मिळालाय , रस्त्यावर छत्र्या- रेनकोट इ. आयुधं सावरत चालणारी वर्दळ दिसतीय , समोर चालू असणाऱ्या बांधकामाचे कामगार काम नसल्याने आडोशाला चहा पीत , गप्पा मारत बसलेत , पावसाने ताजी तवानी झालेली कुंडीतली झाडं - फुलं छान डोलतायत अन् सताड खिडक्या उघड्या टाकून ह्या निवांत सकाळी मी सारं पहात बसलेय.
एकीकडे हे चित्र मनात उमटत असताना दुसरीकडे "केरी" चं अभूतपूर्व सौंदर्य मनाला साद घालतय.
केरी .. उत्तर गोव्यातलं , गोव्याच्या सुशेगाद वृत्तीला शोभणारं एक शांत निवांत गाव अन् त्या गावची देवी विजयादुर्गा .
कधीतरी आंतरजालावर त्या बद्दल कळलं तेंव्हापासून तिथे जायची ओढ लागली होती. यंदाच्या चैत्रात ती पुरी झाली . गोव्यात नेहमीच असतं, तशाच बांधणीचं लांब - मोठ्ठ , स्वच्छ असं मंदीर अन् तसच मोठसं अन् निटस आवार , दारातला शुभ्र पांढरा नंदादीप अन् तुळशीवृंदावन . स्वतःच्याच धुंदित कुणीतरी आवळत असलेले सूर , रामनवमीच्या कार्यक्रमासाठी तयारी करीत असलेले चार दोन सेवक , प्रसन्न चित्त पुजारी आणि इतर देवस्थांनासारखी अजिबात नसलेली वर्दळ.
दोहोबाजूंच्या समयांच्या उजेडाने भरून गेलेल्या गाभाऱ्यातील , काळ्या पाषाणातील दशभुज शस्त्रधारी , पण शांत चेहऱ्याची विजयादुर्गेची नितांत सुंदर मुर्ती. मुर्तीतल्या देवीतत्वासाठी डोळे मिटून नमस्कार करण्यापेक्षा , डोळे भरून तिचं सौंदर्य मनात भरून घेण्याचा मोह होत रहावा अशी झालेली अवस्था.
पण आत्ता मला जास्त खुणावतोय तो त्या परिसरातला भला मोठा तलाव. मंदिरालागूनच लाल चिऱ्यात बांधलेल्या पायऱ्या , भोवती चार दोन कौलारू घरं , शांततेला छेद देणारं पक्षांचं कुजन अन् पायऱ्या उतरताच भेटणारा , मोहून टाकणारा एक अविस्मरणीय देखावा.
नजर पोहचेस्तोवर दिसणारा, नदीच वाटावी असा, जणू ध्यानात बसलायसा विस्तीर्ण तलाव ..त्याच्या समोरच्या तीरावर आकाशाला साद घालणाऱ्या नारळी पोफळीच्या दाट झाडीने वेढून टाकलेला डोंगर ... उजवीकडून अस्ताला चाललेला सूर्य .. ह्या बाजूस खाली मधुनच समोर उमललेली पांढरी - निळी कमळांची बेटं आणि वर आपण.
किती विहंगम - अविस्मरणीय .. मनावर कोरून राहिलेलं दृष्य.
हा स्वर्गच आपल्या दारात आहे हे न जाणवून आपल्याच नादात जगणारे तिथले लोक अन् पर्यटकांच्या लोंढ्यापासून अजून तरी अस्पर्श्य असं राहिल्याने निरव शांतता अन् दुर्मिळ एकांत.
विधात्याने अगदी आनंदात असताना रंगवलेल हे मनोहारी चित्र .. तो साऱ्या हवेत भरून राहिलेला निवांतपणा .. आणि तो उल्हसित श्वास... कसा आणि किती टिपणार अन् कशाने?
घेता किती घेशील दो कराने च्या चालीवर बघता किती बघशील दो नेत्रांने अशी झालेली अवस्था .
आत्ता , मन पुन्हा तिथे जाऊन पोहोचलय. चैत्रात मला भारावून टाकणारं ते सौंदर्य ह्या वेड्या पावसात किती अवर्णनीय असेल ह्या कल्पना विलासातच मोहरून जायला होतय मला.
शांततेचा भंग करीत पाऊस मी म्हणत असेल , त्या विशाल तलावाचं पात्र खुशीनं फुललं असेल , पायऱ्यांना आलिंगन देत आता कदाचित हलक्याश्या लाटाही हिंदकळत असतील , वारा आपल्याच मस्तीत गात असेल , आभाळ नेहमीची निळाई सोडून काजळी झालं असेल , सारी हिरवाई सचैल नहात असेल अन दूरवर एखादी होडी लाटांवर हलकेच डुलत असेल आणि हा सारा निसर्ग पिऊन घ्यायला मी चिंब भिजत काठावर उभी असेन.
प्रत्यक्षात तिथे पावसात कधी जाणं होईल तेंव्हा होईल , तूर्तास ह्या मनातल्या , कल्पनेतल्या दृश्यात - स्वप्नात पुरेपूर न्हाऊन घेतेय मी.
शेवटी रसिक मनाला आकंठ तृप्त करण्याचं जे सामर्थ्य निसर्गात आहे ते आणखी कशातही नाही हेच खरं.
- सौ. मधुरा महेश ताम्हनकर