इतिहास एका लढ्याचा : महाराष्ट्र
HISTORY
5/14/20241 min read
आज १ मे, म्हणजे ‘महाराष्ट्र दिन’. चांदा ते बांदा पसरलेला भारतीय द्वीपकल्पातील पश्चिम-मध्य विभाग म्हणजे महाराष्ट्र आणि आज त्याचा ६१ वा वर्धापन दिन. आपल्यापैकी बहुतेक जण किंवा अगदी सर्वजण म्हटले तरी फारसे चुकीचे ठरणार नाही, ते म्हणजे हा महाराष्ट्र प्रदेश आपण गृहीत धरतो. ‘महाराष्ट्र’ हे नाव भारताच्या नकाशामध्ये १ मे १९६० रोजी आले असले तरी ‘महाराष्ट्र’ हा शब्द फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे अगदी पाचव्या-सहाव्या शतकापासून प्रचलित असलेला दिसतो. अगदी संत ज्ञानेश्वर यांच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत साहित्यामध्ये याचा सरार्स उल्लेख आढळतो.
परंतु, महाराष्ट्र आणि मराठी, महाराष्ट्र आणि मुंबई ह्या सर्व गोष्टी आपण गृहीत धरतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये taken for granted असे म्हणतो. परंतु याच महाराष्ट्रासाठी, त्याच्या मराठीपणासाठी आणि अर्थात मुंबईसाठी आपल्याला कोणती किंमत मोजावी लागली आहे, कोणता लढा द्यायला लागला आहे, ह्याचा फारसा विचार आपल्या ध्यानी-मनी नसतो. त्यासाठी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करावी लागली होती हे आपण विसरतो.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्याची अंतर्गत रचना कशी करावी, ती भाषावार करावी कि कोणत्या वेगळ्या पद्धतीने यावर बऱ्याच चर्चा झाल्या. पंडित नेहरू हे मात्र सुरवातीपासून या तत्वाच्या विरोधात होते. परंतु, आंध्रप्रदेशामधील आंदोलनानंतर आंध्र हा तेलगु भाषिकांचा वेगळा प्रदेश निर्माण झाला. अगदी १ नोव्हेंबर १९५६ साली कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक, मल्याळी भाषिकांसाठी केरळ, तामिळ भाषिकांसाठी मद्रास म्हणजे आत्ताचे तामिळनाडू ही राज्ये अस्तित्वात आली देखील. परंतु,महाराष्ट्र?
हा महाराष्ट्र उदयाला यायला आणिखी चार वर्षे जावी लागली आणि दुर्दैवाने ती ही अस्वस्थतेची, रक्ताळलेली आणि उद्रेकाची. मुळातच मराठवाड्याला पहिल्यांदा भारतात येण्यासाठी आणि नंतर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी लढा द्यावा लागला तर विदर्भाबरोबर करार करावा लागला. मूलतः मराठवाडा हा प्रदेश हैद्राबाद संस्थानामध्ये होता. प्रथम हा हैद्राबाद प्रदेश १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत भारताचा भागच नव्हता. तेथे राज्य होते ते म्हणजे सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचे आणि दुर्दैवाने कितीही जातीयवादी वाटले तरी उल्लेख करणे भाग आहे ते म्हणजे त्याची ती राजवट धर्मांध होती आणि ती कासीम रिझवीच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या रझाकार या संघटने मार्फत सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करत होते. पण या अत्याचारी राजवटीला आव्हान दिले ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी, ह्या थोर नेत्याने आपले संपूर्ण आयुष्य या राजवटी विरोधात पणाला लावले. पण आपल्या दुर्दैवाने आज महाराष्ट्रातीलच सर्व जनतेला त्यांचे कार्य माहित नाही. या बरोबरीनेच हैद्राबाद संस्थान भारतामध्ये विलीन करून घेण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा कणखरपणा ही तितकाच महत्वाचा होता.
१९५६ नंतर या मराठवाडा प्रांतासकट ‘विदर्भ, बेळगाव, धारवाड, कारवार, बिदर, भालकी उंबरगाव पेठा आणि मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’ यासाठी आंदोलन सुरु झाले. त्यासाठी लढत होती ती म्हणजे, ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ आणि त्यामध्ये लढा देत होते, आचार्य अत्रे, श्री.म.जोशी, शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे, स.का.पाटील आणि अन्य थोर नेते. सुरुवातीला तात्कालिक केंद्र व राज्यातील काही नेत्यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी १९५८ साली लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सभेपेक्षा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते श्री.म.जोशी यांच्या सभेला जमलेली लाखोची गर्दी पाहून पंडित नेहरूसुद्धा आश्चर्यचकित झाले व आता संयुक्त महाराष्ट्राला पर्याय नाही हे त्यांना कळून चुकले. त्यानंतर महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्याचे ठरले पण त्यात मुंबई कोणाकडे हा कळीचा मुद्दा ठरला. त्याला मुंबई महाराष्ट्रात रहावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा मोठा लढा उभारावा लागला व मोरारजी भाई देसाई यांच्या तत्कालीन सत्तेविरुद्ध प्रखर संघर्ष करावा लागला. त्याचीच किमंत म्हणजे मुंबईमधील १०५ हुतात्मे.
खरंतर आजही संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अपेक्षित असणारा संपूर्ण महाराष्ट्र अस्तित्वात येणे बाकी आहे आणि निपाणी बेळगाव भागातील मराठी जनता आजही महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करतच आहे. संपूर्ण महाराष्ट्र कधी अस्तित्वात येईल माहित नाही. परंतु,आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व नेते-कार्यकर्ते व हुतात्मे यांना आपण श्रद्धांजली वाहूया!