सावरकर - व्यक्तिमत्त्वांचा विलक्षण संगम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सदर लेख २६ फेब्रुवारी २०२३ मे २०२१ च्या तरुण भारत या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.

HISTORY

5/8/20241 min read

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले कि प्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते एक प्रचंड तेजस्वी असे व्यक्तीमत्व. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची ५७ वी पुण्यतिथी. सावरकर या नावाभोती अनेक वलयं आहेत. काहींनी त्याचा राजकारणासाठी उपयोग केला, काहींनी समाजकारणाची. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर कोणीही कसाही केलेला असो. परंतु, आजच्या काळातही तंतोतंत लागू होणारे सावरकर या व्यक्तिमत्वाकडून मिळणारे धडे घेऊन आपण जर आपली प्रगती करू शकलो नाही तर आपल्यासारखे करंटे व काम नशिबी ते आपणच.

तेव्हा मला सावरकरांचे व्यक्तिमत्व एक युवा म्हणून खूपच भावते. एख्याद्या माणसाची शक्ती काय असते आणि तो ती कश्या पद्धतीने वापरू शकतो हे आपण सावरकरांकडून शिकू शकतो. मला विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीमत्वामध्ये कायम अनेक व्यक्तिमत्वे दडलेली खूप प्रखरतेने जाणवतात. एक म्हणजे या भारतभूमीचे उत्थानासाठी केलेला प्रचंड त्याग आणि त्यासाठी असलेला निर्भीडपणा आणि त्याचे दुसरे टोक म्हणजे त्याच मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ होउन ढसाढसा रडणारे सावरकर. जेव्हा वीर सावरकर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शत्रूशी लढतात आणि लढताना त्या शत्रूला सांगतात,

अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो।

भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो।।

लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला ।

नम्र दाससम चाटिल तो पदांगुला।।

की मला ना अग्नि मारतो ना तलवार. हा भित्रा मृत्यू देखील मला घाबरून पळत सुटतो. मला तुम्ही सिहांच्या पिजऱ्यांत जरी फेकले तरी मी त्याला माझा दास बनवीन. तेव्हा आपण ज्यासाठी लढत आहोत, जे आपले ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आपल्यामध्ये किती आत्मविश्वास असल्या पाहिजे हे आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर वरील ओळीतून दर्शवतात. आजकालच्या काळात याला काहीजण Over Confidance असे देखील म्हणतील. परंतु, जेव्हा आपण सावरकरांच्या अंदमानातील त्यांच्या हालअपेष्टांच्या कथा ऐकतो. तेव्हा ‘भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो’ ही ओळी त्यांनी अक्षरशः जगली आणि सिद्ध केली आहे याची आपल्याला जाणीव होते. तेव्हा एखादे उच्च व मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवताना स्वतःवरील आत्मविश्वास खरंच किती महत्त्वाचा आहे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपल्याला यामधून शिकवतात.

परंतु, हेच सावरकर जेव्हा इंग्लंडला शत्रूच्या गोटात अडकून पडले होते. आपल्या मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ झाले होते, अश्रू ढाळत ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसून म्हणतात,

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागर प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा

त्यात पुढे सावरकर म्हणतात-

प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या

की या इंग्लंड मध्ये भले कितीही सुंदर घरे असूदेत परंतु, मला माझ्या आईची झोपडी असली तरी तीच खूप प्रिय आहे. या माझ्या मातृभूमीशिवाय मला राज्य देखील नको त्यापेक्षा तर मी वनवास भोगीन.

जसे एखादे मूल आपल्या आईच्या विरहाने व्यथित होते, ढसढसा रडते. त्याप्रमाणे सावरकर आपल्या भरतभूमिच्या आठवणीने व्याकुळ होत आहे. तेव्हा यामधून आपल्याला हे जाणवते की, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या व्यक्तीच्या मनातही हा भावनांचा रणसंग्राम सुरु असतो. अंदमानामध्ये १० वर्षांच्या एकांतवास, शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टा सहन करताना. वीर सावरकरांच्या मनामध्ये अनेक वेळा हे असे संग्राम चालू असत.

सावरकरांची मार्सेलिसची उडी सर्वांनाच माहित असते, ही उडी घेतानाही सावरकरांच्या मनामध्ये नक्कीच अनेक विविध विचार घोंगावत असतील. विचारांचे हे टोक ते टोक असा बुद्धीचा प्रवास सतत होत असेल. परंतु तरीही ती उडी ही काही कोणते अविचारीपणाने केलेले धाडस नव्हते. तर ते कितीही बिकट परिस्थिती असेल तरी त्यामध्ये आपली बुद्धी स्थिर ठेवून योग्य तो निर्णय वेळ न दवडता घेणे याचे उत्तम उदाहरण आहे. यामागे चालू जगाच्या राजकारणाचे असलेल्या ज्ञान होते फ्रान्स आणि ब्रिटन या दोन्ही देशांमध्ये कैदी हस्तांतरण करण्याचा कोणताही करार नव्हता. म्हणून अभ्यासाअंती केलेले ते एक धाडस होते. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून ही बुद्धीची स्थिरता हा गुण आपण सर्वांनी आत्मसाद करायला हवा.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अजून एक अत्यंत महत्वाचा गुण जो आजच्या काळात तर खूपच गरजेचं आहे तो म्हणजे Multitasking. परंतु, एकाच वेळेस अनेक क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कार्य कसे करावे?

कारण सावरकरांनी देशसेवा केली आणि ते स्वातंत्र्यवीर झाले. त्यांनी समाजसेवा केली त्यातही उत्तम कामगिरी बजावली, त्यांनी साहित्यनिर्मिती केली तर त्यातही उच्च शिखर गाठून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले. भाषा शास्त्रावर काम केले आणि मराठी भाषेला एक वेगळाच दृष्टीकोन दिला.

तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकाच वेळेस अनेक विविध आघाड्यांवर काम करून त्या प्रत्येक आघाडीत उत्तम आणि प्रतिभावंत असे काम करून दाखवले हा टाईम मॅनेजमेंट आणि multitasking चा त्यांचा गुण आजच्या पिढीने घेण्याची खरेच खूप गरज आहे.

परंतु या सर्वांमध्ये एक गुण कायम होता तो म्हणजे - देशप्रेम! सावरकरांचे मार्ग अनेक होते परंतु प्रत्येक मार्गाचे ध्येय एकच होते ते म्हणजे देशसेवा! सावरकर म्हणत असत ‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो’. तेव्हा आपणा सर्वाना या आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक विविध मार्ग उपलब्ध करून दिलेले आहे. कदाचित पूर्वीची काही समीकरणे, काही पद्धती आज बदलल्या आहेत. परंतु, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रमाणेच आपण आपले ध्येय निश्चित करून उपलब्ध असलेल्या विविध मार्गांनी प्रयत्न व कष्ट करून आपल्या या प्रिय भारतमातेला यशाच्या एका उंच शिखरावर नेवून ठेवूयात! जय हिंद!

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook