आज ‘टिळक’ नक्की कोणाचे?

HISTORY

5/13/20241 min read

टिळक म्हटले की, आपल्यासमोर शब्द उभा राहातो तो म्हणजे ‘लोकमान्य’ आणि बरोबरीनेच त्या शब्दाला साजेशी एक बेदरकार प्रतिमा. पण प्रश्न हा पडतो की आजच्या काळामध्ये हे ‘लोकमान्य’ नक्की कोणाचे? कारण टिळकांना डाव्या पंथातले म्हणावे तर त्याच्या हिंदू धर्माच्या संकल्पनेमुळे ते टिळकांच्या गटात येण्यास कचरतात. त्यांना उजव्या पंथातील म्हणावे तर लखनऊ करार आड येतो आणि टिळकांच्या प्रगाढ वैदिक अभ्यासामुळे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे किंवा तसे समजणारे तर त्यांच्या पासून चार हात लांबच पळतात. तर पुनःच प्रश्न हाच राहतो कि आज ‘टिळक’ नक्की कोणाचे?

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे डावे, उजवे, पुरोगामी असोत किंवा नसोत. परंतु मला तरी असे वाटते की, टिळकांचा गट कोणता तर तो म्हणजे ‘कर्मयोगी’. कारण मंडालेच्या कारागृहामध्ये लोकमान्यांनी गीतेमधील कर्मयोगावर फक्त ‘गीतारहस्य’ हा असामान्य ग्रंथच लिहिला नाही तर, आयुष्यभर आपल्या कृतीतून त्याचे उत्तम दर्शन लोकांना घडवत राहिले. अश्या या ‘कर्मयोगी’ गटातील लोकमान्य टिळकांची आज १०१ वी पुण्यतिथी.

बरं…. टिळकांनी आपला हा ‘कर्मयोगी’ गट हा काही फक्त एका विषयापुरता किंवा एका विशिष्ट गोष्टीकरता जपला होता असे ही नाही. टिळकांनी शिक्षणक्षेत्र, सामाजिक चळवळी, पत्रकारिता, स्वदेशीची चळवळ, लेखन , खगोलशास्त्र, वैदिक अभ्यास, तत्वज्ञान या एक ना अनेक विषयांमध्ये आपला अधिकार सिद्ध केला होता. टिळकांचा अजून एक विशेष गुण म्हणजे त्यांची उद्योजक मानसिकता. ब्रिटिश राजवटीला विरोध म्हणून टिळकांनी स्वदेशीची चळवळ उभी केली. ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकला. परंतु, हे करताना त्यांना याही सत्य परिस्थितीचे भान होते की नुसताच ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकून आपले कार्य साध्य होणार नाही. कारण तितके उत्पादन करण्याची क्षमता भारतीयांकडे त्यावेळी नव्हती. म्हणूनच त्यांनी अनेक भारतीय उद्योगांना स्वतः जातीने लक्ष देऊन प्रोसाहन दिले व सहकार्य देखील केले. त्यातूनच मुंबईमध्ये खास स्वदेशी वस्तूंचे दुकान उघडण्यात आले. लोकमान्य नेहमीच आपल्या मुलांना म्हणत असत, “तुम्ही अगदी जोड्यांचा व्यापार केला तरी चालेल. परंतु ते जोडे असे बनवा की त्याला विलायतेतून मागणी यायला हवी.” म्हणजे इथे लोकमान्य फक्त बहिष्कार टाकून थांबले नाहीत तर, आपल्या कर्मयोगीपणाने त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न त्यांनी चालू केले.

आजकाल आपण सर्वधर्मसमभाव, एकतापूर्ण समाज वैगरे शब्दप्रयोग बरेचदा ऐकतो. अर्थात हे शब्द प्रयोग त्याकाळात टिळकांनी देखील वापरले. परंतु, आपल्या कर्मयोगी स्वभावामुळे त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव, शिवजयंती यांसारखे उत्सव करून जाती-जातीतील तेढ संपवून एकतापूर्ण समाज घडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबरीने लखनऊ करार करून धर्मा-धर्मातील तंटे संपवून खरेच सर्वधर्मसमभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

टिळकांचा अजून एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्याची bounce back करण्याची वृत्ती. टिळकांच्या ६४ वर्षाच्या आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यातल्या वेदोक्त आणि ताईमहाराज प्रकरणांनी तर अक्षरशः त्यांचे रक्त पिले व आता टिळक नावाचे वादळ यामधून परत वर येते की नाही अशी स्थिती निर्माण झाली. टिळकांना चार महिने, दीड वर्ष आणि सहा वर्षे असे तीन मुख्यदा कारावास झाले. परंतु आयुष्यातील या प्रत्येक संकटाला अत्यंत धिरोदात्त पद्धतीने उत्तर देत व प्रत्येक वेळेस ‘पुनःच हरिओम’ चा गजर करत तितक्याच जोराने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ताकतीने bounce back करून आपल्या राजकारणाची, समाजकारणाची सीमारेषा लोकमान्यांनी वाढवली. १९०८ ते १९१४ सालामधील मंडालेच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेत अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. त्याचबरोबर सुटकेनंतर १९१६ सालच्या लखनऊ काँग्रेसचे ऐतिहासिक अध्यक्षपद देखील भूषवले. त्यानंतर लंडनला जाऊन स्वातंत्र्याच्या दृष्टीने बरीच खलबतं केली. टिळकांनी लंडनमध्ये जाऊन साम्राज्यवादाच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या लोकांना भेटून क्रांतीचे बरेच कार्य केले होते. अशाच एका इंग्रज मंत्र्यांनी याबाबत लिहले आहे की, ‘कोणत्याही प्रकारच्या दडपणामुळे किंवा कसल्याही प्रकारच्या अमिषामुळे आम्हाला वश न होणारे एकच भारतीय गृहस्थ आहेत आणि ते म्हणजे टिळक. इतरांना आम्ही काही प्रमाणात तरी आमच्या कडे वळवू शकतो.’

थोडक्यात काय तर हा माणूस कधीही थकला नाही, थांबला नाही की परिथितीसमोर झुकला नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला एक परीक्षा समजून सामोरा गेला. त्यामधून शिकून, आपल्या बाहू अजूनच बळकट करून पुनः पुनः लढत राहिला, कार्य करत राहिला आणि आपल्या प्रत्यक्ष कार्यातून लोकांना अस्सल ‘कर्मयोग’ शिकवत राहिला. म्हणूनच ‘टिळक’ कोणाचे तर टिळक ‘उत्तम कर्म करणाऱ्या कर्मयोगी’ गटाचे.

अश्या या थोर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्यांच्या १०१ व्या पुण्यतिथीनिमित्त साष्टांग दंडवत!

- अपूर्व कुलकर्णी