दृष्टीपलीकडल
PSYCHOLOGYJUNE 2024
6/21/20241 min read
विविधतेने नटलेलं हे सुंदर जग आपण आपल्या निरागस अशा चेतनामय डोळ्यांनी अवलोकन करीत असतो. सृष्टीतील सात रंग आणि त्यांचे मोहक कल्पक चित्र आपल्या डोळ्यांनी आपल्याला अनुभवायला मिळत असतं; परंतु आपल्यातीलच एक समाज या सर्व सौंदर्य पासून वंचित राहत असतो आणि तो म्हणजे चक्षुहीन समाज! होय त्यांचे जन्मजात अंधत्व त्यांना प्रत्येक गोष्टीचे अनुमान लावण्यास भाग पाडतात. त्यांच्या अंधत्व मुळे त्यांच्या पावलांची गती मंदावते. प्रत्येक पाऊल त्यांना मोजून मापून टाकावे लागते. हात लावून किंवा स्पर्शाने अंदाज घेऊन त्यांना मार्गक्रमणा करावी लागते. आणि हे करत असताना त्यांना शारीरिक अपघात किंवा जीवाचा धोका कायम असतो. परंतु अशा भीतीदायक स्थितीतही त्यांनी आपली जीवनशैली प्रभावित केली आहे याचं प्रत्युत्तर मला कालच्या एका प्रसंगावरून आले.
दुपारचे अडीच वाजले होते आणि मी आपले जेवण आटपून ऑफिसला जायला स्टेशनवर पोहोचलो होतो. अर्थात माझी सेकंड शिप असल्याकारणाने मी रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट बघत उभा होतो. नेहमीप्रमाणे मुंबईची लोकल उशिराने येणे अपेक्षित होते. रखरखत्या उन्हात जरा विसावा म्हणून मी जवळच्याच बाकड्यावर बसलो इतक्यात विरुद्ध दिशेने एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक अंध वयस्कर पण दिसायला समजूतदार अशी व्यक्ती काठीने प्लॅटफॉर्मचा अंदाज घेत घेत उतरली. मी पाहिलं की माझ्या जवळच्याच बाकड्यावर सात-आठ बालक महिला व पुरुषांचा समूह बसला होता. आणि ही सारी मंडळी अंध होती. गरिबीने ग्रासलेले पण पोटासाठी क्लिप, पिना,चॉकलेट ,चिक्की विकून रोजगार मिळवणारे हे सारे मेहनती दिसत होते. इतक्यात एका महिलेने हाक दिली "शेंड्या गाडी आली बघ! मामा आलेत आपले". तिच्या या बोलण्याने माझं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे खेचून घेतलं. खरंतर त्यांच्यापैकी कोणीही काहीच बघू शकत नव्हतं तरी त्यांच्या समूहातील ही ज्येष्ठ व्यक्ती याच गाडीतून उतरली आहे याचा अचूक अंदाज तिने लावला होता. दोन मिनिट मीही डोळे बंद करून आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला काहीच दिसत नाहीये या भीतीने दुसऱ्याच क्षणाला डोळे उघडावे लागले. ही कल्पना सुद्धा महाभयंकर आहे. आयुष्य तले सर्वच छोटे-मोठे निर्णय डोळे बंद करून घेण्याची हिंमत माझ्यात नाहीये. परंतु हा समाज ट्रेनमध्ये चढणं-उतरण, रेल्वे क्रॉसिंग, पादचारी पूल अशा सर्वच मार्गांवर आपल्या काठीच्या सहाय्याने पुढे सरकत असतो ही गोष्ट खूपच नवलाईची आहे. गाडीतून उतरलेले ते वृद्ध गृहस्थ या समाजाचा कणा आहे याची जाणीव मला पुढच्याच क्षणी झाली. उतरल्यावर लगेचच काही लहान मुले त्यांना बोलवायला गेली आणि त्यापैकी एक छोट्या शेंबड्या पोरानं "मामा इथे बसा बाकडा खालीये !" असं म्हणत त्यांना खुणावलं. मामा खूप खुश दिसत होते. आज त्यांच्याकडे काहीतरी आनंददायी गोष्ट घडलेली असावी. बसल्या बसल्या मामांनी तंबाखूची पुडी खोलत शिल्पाला आवाज दिला"अरे ये शिरप्या मला दोन गायछाप पुढे आणून दे की" असं म्हणत त्यांनी खिशातून काही नाणी काढली. प्रत्येक नाणं दोन बोटात चाचपून त्यांनी शिरप्याच्या हातात दिले. शिरप्या पैसे घेऊन निघणार इतक्यात मामांनी जरा मोठ्या आवाजात सर्व मंडळींना हाक मारली "काय मंडळी बरं हाय ना व ?! काहून एवढे चूप बसलात?? घशाला कोरड पडली की काय तुमच्या??!! अरे शिरप्या हे घे पैसे आणि आमच्या लेकरांना बी सरबत मागव की" मामांचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला सरबत देण्याचा बेत आखला होता बहुतेक. मामांचे शब्द ऐकून पोरटोर लागली उड्या मारायला."मामा मला काल वालं ..मामा मला लाल वाला"जो तो आपापला आवडत सरबत रंगानुसार सांगू लागला. जन्मजात अंधत्व लाभलेल्या या लहानग्यांनी काळा आणि लाल रंग कसा असतो हे पाहिलं तरी असेल का? हा प्रश्न मला मीच विचारत होतो पण तरीही त्या वेगवेगळ्या रंगाच्या सरबतात त्यांचा सप्तरंगी आनंद सामावलेला होता.
एवढ्यात त्यांच्या या लवाजम्यात दोन गाणाऱ्या अंध व्यक्तींचा समावेश झाला त्यातील एक महिला आपल्या एका हातात घुंगरू आणि दुसऱ्या हातात पैसे गोळा करण्याचा डबा घेऊन उभे होते तर दुसरा इसम हातात लाल पांढरे काठी घेऊन उभा होता."काय रे मामा आज कोणत्या गाडीला होता रे तू? कर्जत मध्ये तर नाही ना चढला होता तू?"त्या इसमाने मामाला प्रश्न केला."अरे सांगतो लेका सांगतो आधी जरा दम खा आणि सरबत घे सांग कुठलं पिणार तू सरबत"मामाने जवाब दिला. तसे सारे जण एकत्र म्हणाले"मामा आज तुझी लय चांगली आहे ना व ?कारण तुझे पोस्टातले पैसे मिळायचे होते ना व?"त्यांच्या समूहातल्या अंध वयस्कर मावशीने प्रश्न केला आणि हसत हसत मामाने "गावले की" असं उत्तर दिलं. अंधसमूहातले हे मामा आपल्या रोजच्याच मिळकतीतून काही पैसे पोस्टाच्या नावाने वाचवत होते आणि त्याचा लाभ त्यांना आज झाला होता. आपल्या या आनंदात त्यांनी प्रत्येकाला सामावलेलं होतं याचं कौतुक मला वाटत होतं. बघता बघता सर्वजण आपल्या चर्चेत मग्न झाले आणि इथून मला माझ्या गाडीची चाहूल लागली.
या अंधांच्या जीवनातला हा प्रसंग मला माझ्या जीवनात अंधांबद्दल खोल विचार करायला लावून गेला हे मात्र नक्की. कठीण अशा जीवनशैलीवर मात करून आपल् आयुष्य आपल्या स्टाईल प्रमाणे जगण्या ची नवीन शिकवण हे सर्व मंडळी आपल्याला देत आहेत.
-अवधूत बागवे