देहांत

(कोरोनाच्या/ युद्धाच्या पार्श्वभूमीवर)

POEMSमराठी MAY 2024

5/31/20241 min read

कधी संपणार कळत नाही मृत्यूचे हे तांडव,

जन्माचे मृत्यू कडे जगण्याचे हे आर्जव,

कुणास ठाऊक उद्याचा दिवस सूर्य उगवेल का?

कुणास ठाऊक रात्रीचा अंधार मावळेल का?

कुणी जावे कुणी राहावे,

सगळेच कसे दैवाच्या आधीन,

प्रार्थनेच्या ओंजळीत एक हुंदका विसावेल का?

काल होते आज नाहीत,

आपलेच सगळे चालले साथ सोडून,

सहवासाची जागा रिक्त,

आठवणींचे पाश मागे ठेवून

नको नकोस झालाय आता, जन्म मृत्यूचा हा संघर्ष,

देवा एकदाच क्षमा कर, धुवून टाक सगळेच आर्त,

मृत्यूच्या संवेदना नको इतक्या बोथट व्हायला,

की माणसासाठी रडायला माणूसच नको रहायला.

कवयित्री - स्नेहा वैद्य